Saturday, February 11, 2012

शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण


मराठी माणसांना भावणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा सांभाळण्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अपयश आल्यामुळे शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा आवाज चिडीचूप झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज वाढला आहे. मराठी माणसांना भावणारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांची प्रतिमा सांभाळण्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना अपयश आल्यामुळे शिवसेनेच्या मतांवर मनसेचे आक्रमण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांची पूर्ण स्टाईल तसेच प्रचारामध्ये शिवसेनेचेच प्रसिद्धितंत्र अवलंबिले असल्याचा परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल. या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या मतविभाजनचा फायदा काँग्रेस-आघाडीला झाल्याने मुंबईत सत्तांतर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

गेल्या निवडणुकीवेळी मनसे एक वर्षाचे बाळ होते. तरीही मनसेने सात नगरसेवक निवडून आणले होते. पहिल्याच निवडणुकीत मिळालेल्या यशाने मनसेचा आत्मविश्वास वाढला. राज ठाकरेंनी त्यानंतर वारंवार मराठी भाषा, मराठी माणूस,महाराष्ट्राची संस्कृती ही शिवसेनेची समजली जाणारी सर्व प्रचारसाधने वापरत सतत प्रसिद्धी झोतात राहण्याचे तंत्र अवगत केले.

परप्रांतीयांबाबत टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेकडे आकर्षित होणार तरुणवर्ग मनसेकडे आकर्षिला गेला आणि 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये उमेदवार उभे केले. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी दीड-दीड लाख मते मिळविली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने जोरदार मुसंडी मारत 14 आमदार निवडून आणले. त्यापैकी सहा एकट्या मुंबईतील आहेत.  

शिवसेनेला मात्र जोरका झटका बसला आणि त्यांचे केवळ चारच आमदार निवडून आले. तेदेखील पश्चिम उपनगरातच. शिवसेनेची मते मनसेकडे वळल्याने शिवसेना पूर्ण गलितगात्र झाली. या वेळी 227 मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार उभे केले असून किमान 65 जागा निवडून येतील, असा दावा त्यांच्याकडून केला गेला. मात्र जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसा हा आकडा 40 पर्यंत खाली आला आहे. राज वगळता मनसेकडे मुंबईत सर्वमान्य असेल असा एकही नेता नाही, बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, प्रवीण दरेकर यांनी काही प्रमाणात लोकप्रियता मिळवली असली तरी नेत्यांची मोठी फळी त्यांच्याकडे नाही त्यामुळे 40 चा आकडा खाली आला असून प्रत्यक्षात सुमारे 25 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. 

निवडणुका जाहीर झाल्यापासून राज ठाकरे यांनी नियोजनबद्धतेने प्रसिद्धी माध्यमांच्या झोतात राहण्याचा प्रयत्न चालविला आहे. निवडणूक आयोगाचे लोणचे घालण्यापासून ते शिवाजी पार्कचे मैदान मिळाले नसल्याने रस्त्यावर सभा घेण्याची घोषणा करण्यापर्यंत बिनधास्त वक्तव्य करून प्रसारमाध्यमांना खाद्य पुरविले. शिवसेनाप्रमुख जशी कोणाचीही पर्वा न करता बेधडक विधाने करीत तशीच विधाने करीत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या मतांवर आक्रमण केले आहे. मात्र या दोन पक्षांत मताचे विभाजन होऊन त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP