Monday, February 13, 2012

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच आघाडीवर

एका राज्याचे बजेट असलेल्या महानगरपालिकेने शहराचा विकास करणे सहज शक्य असताना हा पैसा मातोश्रीतील भूमिगत दालने भरून ठेवण्यासाठी जमवण्यात आला असल्याचे सर्रास बोलले जाऊ लागले आहे. महानगरपालिकेचा मलिदा खाताना ज्यांनी इतकी वर्षे निवडून दिले त्या मराठी माणसाकडे दुर्लक्ष करणा-या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दंड थोपटून मैदानात उतरली आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुकीतील ढोल-नगा-यांचा आवाज वाढत चालला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचे बॉम्बगोळे फुटू लागले आहेत. महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र असलेल्या मुंबई शहराची प्रतिष्ठा जागतिक नकाशावर वाढविण्याऐवजी या शहराला गलिच्छ, बकाल करून टाकणा-यांना तसेच, लोकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवणा-यांना सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. एका राज्याचे बजेट असलेल्या महानगरपालिकेने शहराचा विकास करणे सहज शक्य असताना हा पैसा मातोश्रीतील भूमिगत दालने भरुन ठेवण्यासाठी करण्यात आला असल्याचे सर्रास बोलले जाऊ लागले आहे. महानगरपालिकेचा मलिदा खाताना ज्यांनी इतकी वर्षे निवडून दिले त्या मराठी माणसाकडे दुर्लक्ष करणा-या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दंड थोपटून मैदानात उतरली आहे. स्टार प्रचारकांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकजण जीव ओतून प्रचार करीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर लगेच महापालिका निवडणुका आल्याने प्रचाराला वेळ कमी पडत आहे. मोठमोठय़ा नेत्यांच्या सभा आपल्याच विभागात व्हाव्या यासाठी उमेदवार आणि तेथील स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची विमाने-हेलिकॉप्टर आकाशात घिरटय़ा घालत आहेत. वृत्तवाहिन्यांवर नेत्यांच्या मुलाखती आणि वादविवाद यांचा मारा चालला आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला या सहा महापालिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, सोलापूर या चार महापालिकेत मात्र आघाडीची बिघाडी झाली असून हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहे. तरीही सर्वाचे लक्ष मुंबईच्या भल्याकडे लागले आहे. मुंबई महापालिकेत गेली सोळा वर्षे शिवसेना-भाजपची युतीची सत्ता आहे. परंतु युतीने करून दाखवलेनसल्याने सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. केंद्रात आणि राज्यात आघाडीची सत्ता असल्याने महापालिकेतही आघाडीची सत्ता आली तर, कारभारामध्ये समन्वय ठेवणे सोयीचे होईल, असे वास्तवाचे भान आणि राजकीय शहाणपण आघाडीच्या नेत्यांनी दाखवले आहे.

जिल्हा परिषद निवडणूकांच्या प्रचारासाठी एक सभादेखील न घेणारे शिवसेना-भाजप नेते मुंबई, ठाणे, पुणे या शहरांसाठी जिवाचे रान करू लागले आहेत. या मोठय़ा महानगरपालिका हातात ठेवल्या तर, पैसाही खुळखळत राहील आणि त्यामुळे पक्षही चालवता येईल. केवळ हाच उद्देश ठेवून भावनिक आवाहने करीत युतीने सत्ता काबीज केली होती. पण, आता मात्र सर्वाचे डोळे सताड उघडले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तर, शिवसेनेला मालमत्ता जाहीर करा, असे थेट आव्हानच दिले आहे. एकही उद्योगधंदा नसताना ठाकरे कुटुंबीयांचे भागते कसे, ही शंका सर्वसामान्य माणसांच्या मनात होतीच. राणे यांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही कमालीचे अस्वस्थ झाले असून लोकांना पटेल असा खुलासा करणे त्यांना अशक्य झाले आहे. 

काँग्रेस - राष्ट्रवादीने समंजसपणा दाखवत जसे एकजुटीने काम केले तसेच महापालिकेतील युतीचा भ्रष्ट कारभार चव्हाटय़ावर मांडण्यात नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानसंघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. दिनदर्शिकेच्या माध्यातून मुंबईचे बकालपण त्यांनी लोकांसमोर आणलेच परंतु निवडणुकीचा प्रचार ऐन टिपेला पोहचला असताना स्वाभिमान संघटनेने पथनाटय़ाच्या माध्यातून केलेली लोकजागृतीही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. अशी चोहोबाजूंनी खंबीर मोर्चेबांधणी झाल्याने येत्या 16 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावर गेलेला मतदार आघाडीलाच मतदान करील असे वातावरण आहे. हे मतदानच मुंबईमध्ये सत्तांतर घडवील, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. धर्म आणि जातीच्या नावावर तसेच मराठीच्या मुद्दय़ावर मते मागणा-या जातीयवाद्यांच्या हातातून मुंबईची सुटका करायची असेल तर पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळले पाहिजे, हे दोन्ही काँग्रेसच्या लक्षात आले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन युतीची सत्ता सलग तिस-यांदा महापालिकेत आली. यावेळी मात्र निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच दोन्ही बाजूंनी आघाडीसाठी गांभीर्याने प्रयत्न झाले.
 
शिवसेना-भाजपने रिपाइंशी महायुती करून निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवसेनेच्या मराठी मतांमध्ये झालेली घुसखोरी पाहता शिवसेनेची चांगलीच घसरण होण्याची शक्यता दिसत आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या मनसेचे गेल्या निवडणूकीत सात नगरसेवक निवडून आले होते. पाच वर्षात मनसेची ताकद वाढली असल्याने त्याचा फटका शिवसेनेलाच बसणार आहे. जे मुद्दे घेऊन शिवसेनेने राज्य केले तेच मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडून शिवसेनेची परंपरागत मते आकर्षित करण्यास राज ठाकरे यांना यश येत आहे. मराठी भाषा, स्थानिकांचे प्रश्न आणि बिनधास्त वाणी याच्या बळावर राज यांनी शिवसेनेकडे आकर्षित होणारा वर्ग आपल्याकडे वळविला आणि म्हणून 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेपेक्षा मनसेचे जास्त आमदार निवडून आले.
 
मनसे आणि शिवसेना-भाजप रिपाइं महायुतीमध्ये मतांचे विभाजन होईल. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीची परंपरागत धर्मनिरपेक्ष एकगठ्ठा मते आघाडीला मिळतील. विकासाची दृष्टी असणारा डोळस मतदारही यावेळी आघाडीच्या बाजूनेच मतदान करण्याची शक्यता आहे. गेली सोळा वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेना-भाजप युतीकडे असताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. रस्ते, गटारे, पाणी यांची कंत्राटे ठराविक लोकांना देऊन टक्केवारी घेण्यातच युतीचे नेते गुंग होते. नागरी सुविधांची कामेही नीट करता आली नसल्यामुळे लोकांमध्ये युतीबद्दल प्रचंड नाराजी पसरली आहे. जग झपाटय़ाने बदलत चालले आहे, नव-नविन सुधारणा होत आहेत, प्रमुख शहरांचा वेगाने विकास होऊ लागला आहे, रस्ते सुधारले, दळणवळणाची साधने अत्याधुनिक झाली, उद्याने, वाहतूक बेटे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी साधने वाढली. पर्यटकांना आकर्षित करणारी मनोरंजन स्थळे विकसित झाली. म्हणून त्या-त्या शहरांचा नावलौकिक होऊन तेथे पर्यटकांची संख्या वाढली आणि त्या माध्यमातून शहरांचा विकासही झाला.

मुंबई ही एकेकाळी जगातील अत्यंत नावलौकिक असणारे शहर होते. भारतात येणारे 54 टक्के पर्यटक मुंबईला भेट दिल्याशिवाय परत जात नव्हते. मात्र बदलत्या जगाबरोबर मुंबई शहर बदलले नाही. इथले रस्ते सुधारले नाहीत. उलट दर पावसाळय़ात रस्ते खड्डय़ात की, खड्डे रस्त्यात हेच कळेनासा झाले. खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना पैसे वाढवून दिले जातात. पण, सुधारणा दिसत नाही. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती पाहावयास मिळते. मुंबईत वाढणारी झोपडपट्टी तसेच पदपथावरील झोपडय़ा हटवण्यास युतीच्या नेत्यांना यश आले नाही. मुंबईकडे पर्यटक आकर्षित व्हावा, असे एकही विरंगुळय़ाचे ठिकाण गेल्या सोळा वर्षात युतीच्या नेत्यांनी बनविले नाही. खरेतर चोहोबाजूने लाभलेल्या समुद्र किना-याचे शहर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अत्यंत पोषक आहे. ही बाब मतदारांच्या लक्षात आणून देण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्याने मतदार जागा झाला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP