Monday, February 27, 2012

जड झाले ओझे..

उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे आल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये सुसंवाद राहिला नव्हताच. उलट दूरध्वनीवरदेखील संवाद होत नव्हता. गडकरी-मुंडे यांचे फोन बाळासाहेबापर्यंत पोहोचत नव्हते. उद्धव यांनी बाळासाहेबांना नजरकैदेत ठेवले आहे, अशी चर्चा भाजप गोटात होत होती. अखेर अत्यंत सरळ आणि स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींची सहनशीलता संपली. शिवसेनाप्रमुखांना केलेले फोन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच ‘सामना’ दैनिकातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका छापून येत असते, असे जाहीर वक्तव्य करून गडकरींनी शिवसेनेला धक्क्याला लावू शकतो, असा संदेश दिला आहे.


शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीची घोषणा होताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि डाव्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले व्यासपीठावर उभे आहेत. महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. अशा वेळी या तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या हातात हात गुंफून आणि हे गुंफलेले हात उंचावून महायुती झाल्याचे सर्वाना दाखवत आहेत, असे दृष्य दिसेल अशी लोकांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांनी आपला उजवा हात आपल्या डाव्या हाताला असलेल्या रामदास आठवलेंच्या हातात दिला आणि सुधीर मुनगंटीवारांनी उजव्या बाजूने वाकून त्या दोघांचा हात हातात घेतला. याचा अर्थ डाव्या हाताला असलेल्या आठवलेंच्या हातात उजवा हात देताना उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. हे दृश्य वृत्तवाहिन्यांवर उभ्या महाराष्ट्राने पाहिले. खरे तर डाव्या विचारांच्या आठवलेंच्या हातात डावा  हात चालला असता आणि उजव्या विचाराच्या मुनगंटीवाराच्या उजव्या हातात पूर्वीप्रमाणेच हात देता आला असता. पण आठवले भेटल्याबरोबर शिवसेनेने उजव्यांना डाव्याची वागणूक देणे सुरू केले. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच नाराजी पसरली. या पूर्वीदेखील वेळोवेळी शिवसेनेने भाजपला कमी लेखून आपलीच शिरजोरी दाखवली आहे.

शिवसेनाप्रमुखांपासून ते संजय राऊतांपर्यंत सगळेच भाजप आणि त्यांच्या नेत्यांची खिल्ली उडवत होते. गेली 25 वर्षे अधूनमधून हा प्रकार सहन करणाऱ्या भाजपचा कडेलोट झाला आहे. शिवसेनेचे हे जड झालेले ओझे आता उतरवावे अशा मनस्थितीत भाजप असल्याचे नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने दाखवून दिले आहे.

शिवसेना-भाजप युती यापूर्वीदेखील अनेकदा तुटण्याच्या मार्गावर होती. पण भाजपने कमीपणा घेऊन जमवून घेतले होते. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून शिवसेनेचे खासदार कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सतत भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध लिखाण सुरू ठेवले होते. जेव्हा जेव्हा युती धोक्यात आली तेव्हा युतीचे शिल्पकार असलेल्या प्रमोद महाजनांनी जुळवून घेतले होते. गेल्या सप्ताहात अशी वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. महाजनांच्या भूमिकेत मुंडे शिरले असले तरी नितीन गडकरी कितपत प्रतिसाद देतील याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. गडकरींनी शिवसेनेची भाजपबाबत असलेली भूमिका आणि भाजपबाबत शिवसेनेची बदलेली वर्तवणूक पाहता युती ठेवायची की नाही, यासंबंधी भाजपने गांभीर्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळेच गडकरींनी त्यांच्याबाबत रोखठोक वक्तव्य केले. भाजपला मनसेच्या रूपाने नवा मित्र मिळणार असल्याने शिवसेनेशी युती मोडू शकते, याचा अंदाज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आला असावा त्यामुळे ठाकरेंनीच भाजप नेत्यांना पाचारण केले असावे. या बैठकीला नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे इतरांच्या समवेत युतीचा खुंटा हलवून घट्ट करावा असा पोक्त विचार शिवसेनाप्रमुखांनी केलेला दिसतो. बाळासाहेबांनीदेखील भाजपला फटकारले आहे. कमळाबाई असे संबोधून त्यांची अवहेलना केली आहे. अटलबिहारी वाजपेयी वगळता इतरांवर त्यांनी वेळोवेळी टीका केली आहे. मनसे संबंधांमुळेदेखील भाजपची कानउघाडणी त्यांना करता आली असती. पण शिवसेनेची गेल्या विधानसभा आणि यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकांतील घसरण झालेली पाहता भाजपशी दोस्ती मोडणे महागात पडेल यांची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी भाजपच्या हातात आपला उजवा हात देण्याचे ठरविले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची मोठी पडझड झाली. नारायण राणे यांच्यापाठोपाठ राज ठाकरे बाहेर पडले होते. त्याचा जोरदार धक्का बसून शिवसेनेचे बुरूज ढासळले. शिवसेना-भाजप युतीच्या निवडणूक फॉम्र्युल्याप्रमाणे शिवसेनेने 171 जागा लढवून त्यांच्या 45 जागा निवडून आल्या तर भाजपने केवळ 117 जागा लढवून त्यांच्या शिवसेनेपेक्षा दोन जास्त म्हणजे 47 जागा आल्या. साहजिकच विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले. विधानसभेबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपददेखील भाजपकडे आहे. महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची घसरण झाली असून भाजपने मात्र आपल्या जागा कायम राखत काही ठिकाणी आपली ताकद वाढवली आहे. मुंबई महापालिकेत शिवेसनेच्या जागा कमी झाल्या असून भाजपच्या जागा वाढल्या आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी भाजपला चांगले यश मिळवून दिले आहे. तेथे भाजपच्या सहा जागा वाढून एकूण संख्या 62 झाल्या आहेत. तर शिवसेनेच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. अकोल्यामध्ये शिवसेनेला केवळ एक जागा अधिक मिळाली आहे. तर भाजपच्या सात जागा वाढल्या आहेत. सोलापूर  आणि पुण्यामध्येदेखील भाजपच्या जागा वाढून शिवसेनेच्या कमी झाल्या आहेत.

नाशिक महापालिका निवडणुकीत तर शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले आणि भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवल्या. शिवसेनेच्या सहा जागा कमी झाल्या. एवढेच नव्हे तर मनसेबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन करण्याच्या हलचालीही भाजपने सुरू केल्या. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. किंबहुना यापुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेला बाजूला सारून मनसेबरोबर जाण्याची ही नांदीच आहे, हे ओळखून बाळासाहेबांनी  जमवून घेण्याचे ठरवले. ‘तुझे-माझे जमेना पण तुझ्या वाचून करमेना’ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.

शिवसेनेने जरी कमळाबाईचा अनुनय केला असला तरी भाजप मात्र वेगळा घरोबा करण्याचा मन:स्थितीत आहे. एवढे दिवस शिवसेनेच्या मागे फरफटत जाणा-या भाजपने नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने पुढे जाण्याचे ठरविलेले दिसते.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात चहासाठी गेले. राज ठाकरेंनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे केलेले कौतुक आणि निवडणुकीआधी नितीन गडकरी यांची विमानात भेट घेऊन केलेली चर्चा यावरून भाजप मनसेचे सूर जुळू लागल्याचे स्पष्ट दिसू लागले. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेशी घरोबा करण्याच्या हालचाली सुरू करून गडकरींनी शिवसेनेला खिजवण्याचा पवित्रा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेनेची सूत्रे आल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये सुसंवाद राहिला नव्हताच. उलट दूरध्वनीवरदेखील संवाद होत नव्हता. गडकरी-मुंडे यांचे फोन बाळासाहेबापर्यंत पोहोचत नव्हते. उद्धव यांनी बाळासाहेबांना नजरकैदेत ठेवले आहे, अशी चर्चा भाजप गोटात होत होती. अखेर अत्यंत सरळ आणि स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींची सहनशीलता संपली. शिवसेनाप्रमुखांना केलेले फोन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत तसेच सामना  दैनिकातून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सतत टीका येत असते, असे जाहीर वक्तव्य करून गडकरींनी शिवसेनेला धक्क्याला लावू शकतो, असा संदेश दिला आहे. मनसेच्या रूपाने नवा मित्र मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेला पर्याय असल्याचे संकेत गडकरींनी एक प्रकारे दिले आहेत.  शिवसेनेने कमळाबाई संबोधून उडवलेली खिल्ली आणि केलेली टीका-टिपण्णी यांचे मणामणाचे ओझे उतरवून टाकू शकतो, अशी मानसिक तयारी झाली असल्याचा इशाराच गडकरींनी शिवसेनेला दिला आहे. 

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP