Thursday, April 14, 2011

आत कीर्तन.. बाहेर तमाशा!


आतून कीर्तन वरून तमाशा.. असा वाक्प्रचार आहे. त्याची प्रचिती बुधवारी विधानभवनात आली.सभागृहात चर्चेचे कीर्तन रंगलेले असताना बाहेर मात्र आरोप-प्रत्यारोपाचा तमाशाचा फड रंगला होता.

आतून कीर्तन वरून तमाशा.. असा वाक्प्रचार आहे. त्याची प्रचिती बुधवारी विधानभवनात आली. एरवी सर्वाचे लक्ष सभागृहातील कामकाजावर असते. जे सभागृहात घडते त्याची चर्चा सर्वत्र होत असते. बुधवारी मात्र जरा वेगळेच घडले. सभागृहातील कामकाज अत्यंत शांतपणे सुरू होते. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेचा काल शेवटचा दिवस होता. एखाद्या प्रवचनकाराप्रमाणे प्रत्येक आमदार आपल्याला दिलेल्या वेळेत भाषण आटोपते घेत होता. प्रत्येक आमदाराला दोन किंवा तीन मिनिटे दिली होती. इतक्या कमी वेळेत काय भाषण करायचेकाय मुद्दे मांडायचे आणि सरकारकडे काय मागण्या करायच्याहा गहन प्रश्न होता. तरीही आपण रेकॉर्डवर यायला हवेम्हणून मोठय़ा भक्तिभावाने भाषणे चालली होती. विशेष म्हणजे इतक्या आमदारांनी केलेल्या भाषणावर चार मंत्र्यांनी उत्तरे दिली. खरे तर कोणतीही चर्चा झाल्यानंतर प्रत्येक आमदाराने उपस्थित केलेल्या मुद्दय़ाची मंत्र्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा असते. परंतु प्रत्येक मंत्र्याला उत्तर देण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असल्याने त्यांना थोडा अधिक वेळ मिळाला. मात्र वर्षा गायकवाडलक्ष्मण ढोबळे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी तर केवळ सभागृहातील सर्व सदस्यांनी मांडलेल्या मुद्दय़ाची दखल घेतली जाईल. अनुदानाच्या मागण्या मान्य कराव्यात’ एवढेच शब्द उच्चारले.
 
सभागृहात असे चर्चेचे कीर्तन रंगलेले असताना बाहेर मात्र आरोप-प्रत्यारोपाचा तमाशाचा फड रंगला होता. येरवडा येथील मुकुंद भवन ट्रस्टला नियमबाह्य जमीन दिल्याचा आरोप करताना त्यात सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचीही नावे घेऊन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गेल्या आठवडय़ात खळबळ उडवून दिली होती. हा गैरव्यवहार झाला तेव्हा श्रीनिवास पाटील पुण्याचे जिल्हाधिकारी होते. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत. खडसे यांनी आरोप केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस अथवा पवार कुटुंबीयांकडून कोणताही खुलासा झाला नव्हता. काल अचानक श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले. पाटील आता खडसे यांनी केलेल्या आरोपांना काय उत्तर देतात याचीच चर्चा विधानभवन परिसरात होती. तिकडे श्रीनिवास पाटील यांनी पत्रकार परिषदेची घोषणा करतानाच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीही पत्रकारांशी बोलणार असल्याचे निरोप पाठवले. म्हणजे नेहमी सभागृहात रंगणारे आरोप-प्रत्यारोपाचे नाटय़ बाहेर रंगणार होते. श्रीनिवास पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे खडसे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर खडसे यांच्या विरोधात सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचेही जाहीर केले.

पाटील यांची पत्रकार परिषद संपताच खडसे यांनीही पत्रकार परिषद घेतली. त्यात खडसेंनी पाटलांचे आव्हान स्वीकारल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्याच बरोबर पाटील कोणत्या अधिकारात हक्कभंग प्रस्ताव आणणार, असा सवालही केला. या आरोप-प्रत्यारोपाबरोबर विधानभवनात सर्वाचे लक्ष न्यायालयाकडेही लागले होते. ते दुस-याच कारणाने. कारण त्यात मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद पोटनिवडणुकीचे भवितव्य ठरणार होते. जेव्हा निवडणुकीचे अडथळे दूर झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले तेव्हा काँग्रेसजनांना दिलासा मिळाला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP