Tuesday, April 19, 2011

खडसे असे कसे


जैतापूरात प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दुर्दैवाने एका आंदोलकाचा बळी गेला. हा प्रकार घडल्याची बातमी विधानभवनात पोहोचली आणि अर्थातच त्याचे तीव्र पडसाद उमटणार असे वाटू लागले. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेच नव्हते.

सोमवारी सभागृहात भलतेच घडले. या राज्याला विरोधी पक्षनेता आहे की नाही असे वाटले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात प्रकल्प विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तो हाणून पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली. प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दुर्दैवाने एका आंदोलकाचा बळी गेला. प्रकल्पाला समर्थन असो की विरोधएका माणसाच्या पोलिस गोळीबारात मृत्यूचे समर्थन होऊच शकणार नाही. जैतापूरात हा प्रकार घडल्याची बातमी विधानभवनात पोहोचली आणि अर्थातच त्याचे तीव्र पडसाद उमटणार असे वाटू लागले. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेच नव्हते. सरकारला जाब विचारण्याऐवजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे बाहेर जाऊन आरामात बसल्याची चर्चा सर्वजण करत होते.
 
खडसे सभागृहाबाहेर आणि ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते त्या शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांचे बोलणे ऐकून पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार नव्हे पुष्पवर्षाव केला की कायअसे वाटावे इतके त्यांचे बोलणे पचपचीत आणि सपक होते. आंदोलकाचे मरणे दुर्दैवी आणि मरणानंतरचे सभागृहातील सोपस्कारही दुर्दैवी. देसाईंच्या भाषणानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निवेदन केले आणि देसाई शांत बसले. एवढेच नव्हे तर कामकाज पुढे चालू झाले.

या प्रकाराने अचंबित झालेले मनसेचे बाळा नांदगावकर उठले आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावली. या सरकारला संवेदनाच नाहीत, असा हल्ला चढवत प्रकल्प उभारा पण माणसांना ठार मारता कशाला? असा सणसणीत सवाल त्यांनी केला. त्यांना शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी जोरदार पाठिंबा दिला. पुढे गेलेले कामकाज मनसे आणि शेकापने या दोन विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी पुन्हा मागे आणले आणि सरकारला धारेवर धरले. शिवसेना, भाजप मात्र चिडीचूप होते. मनसे, शेकाप सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहून शिवसेना, भाजप त्यांच्यामागे गेले आणि मग सर्वानी सभात्याग केला. विशेष म्हणजे सभागृहाचे कामकाज बंद पडेल, असा गोंधळ गदारोळ झालेला नसतानाही अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले. चर्चा मात्र सुरू झाली की, देसाई तसेच पण खडसे असे कसे?

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP