Tuesday, April 12, 2011

लेडीज क्लब


सोमवारी सभागृहात थोडे वेगळे घडले. नेहमी पुरुष आमदारांचे गप्पांचे फड रंगतात, पण सोमवारी प्रथमच सभागृहातील चार महिला एकत्र येऊन गप्पा मारत होत्या. त्यातही तीन पिढय़ांचे प्रतिनिधित्व दिसत होते.



विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन प्रदीर्घ काळ चालवण्याच्या नादात या आठवडय़ात विधानसभेचे कामकाज दोन दिवस ठेवण्यात आले आहे. रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दोन सुट्टय़ा आल्या आहेत. एक दिवसाआड येणा-या या सुट्टय़ांमुळे विधान परिषदेचे कामकाज मात्र आठवडय़ात पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. मात्र विधानसभेने एक दिवसाआड येणा-या कामकाजाच्या दोन दिवसांसाठी सभागृह सुरू ठेवले. असे एक दिवसाआड उपस्थित राहण्याची ना आमदारांना इच्छा होती ना मंत्र्यांना..

त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण विधानभवनात सुट्टीचाच मूड होता. सभागृहातील उपस्थिती अत्यंत तुरळक होती. शालेय शिक्षण व क्रीडा, जलसंपदा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि आदिवासी विभागाच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात चर्चा होती. या चर्चेत ज्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार होती तेवढेच आमदार आणि त्या विभागाचेच मंत्री सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे सभागृहातील वातावरण अत्यंत शांत होते. शेरेबाजी, हरकती,एकमेकांची अडवणूक असला कोणताही प्रकार झाला नाही. अशा चर्चा ज्यावेळी सभागृहात होतात, तेव्हा काही आमदार आपल्या जागा सोडून मागच्या बाजूला वैयक्तीक गप्पांच्या फडात रंगल्याचे अनेकदा पहायला मिळते. ज्या वेळी पुरुष आमदार गटागटाने गप्पा मारतात किंवा सभागृहात इकडून तिकडे फिरत असतात त्यावेळी महिला आमदार मात्र आपापल्या जागेवर चर्चा शांतपणे ऐकताना दिसतात किंवा चर्चेत सहभागी होत असतात.
 
सोमवारी मात्र सभागृहात थोडे वेगळे घडले. नेहमी पुरुष आमदारांचे गप्पांचे फड रंगतात, पण सोमवारी प्रथमच सभागृहातील चार महिला एकत्र येऊन गप्पा मारत होत्या. त्यातही तीन पिढय़ांचे प्रतिनिधित्व दिसत होते. सभागृहातील आक्रमक आणि अभ्यासू महिला आमदार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या शेकापच्या आमदार मीनाक्षीताई पाटील, दोन वेळा निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्री बनलेल्या वर्षा गायकवाड, पहिल्यांदाच निवडून आलेल्या निर्मला गावित आणि तरुणाईचे प्रतिनिधित्व म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या प्रणिती शिंदे एकत्र आल्या होत्या. मीनाक्षीताईंच्या चेह-यावर नेहमीचा आक्रमक भाव नव्हता, वर्षा गायकवाड यांच्या चेह-यावर मंत्रिपदाचा आव नव्हता आणि निर्मलाताई आणि प्रणिती यांनी नवखेपणा झुगारून दिला होता. त्या चौघी मागच्या बाकावर बसून गप्पात रंगून गेल्या होत्या.

काय बरे बोलत असतील त्या? मीनाक्षीताई म्हणत असतील, आमच्या अलिबागचा जिताडा मासा कधी खाल्ला आहे का?आमच्याकडे माशाचे वेगवेगळे प्रकार मिळतात. कोळंबीमध्ये करवंद आणि वांगी घालून केलेली डिश तुम्हाला खाऊ घालते. वर्षा गायकवाड नक्कीच प्रणितीचे टापटीप राहणे आणि अधूनमधून राजकारण या विषयी बोलत असाव्यात. प्रणिती शिंदे सोलापूरच्या चादरी आणि सुती साडय़ा यांचे गुणगाण गात असतील. तर निर्मलाताई मीनाक्षीताईंबरोबर एकमेकींच्या साडय़ांची चर्चा करीत असाव्यात. वर्षा गायकवाड आमदार झाल्या, राज्यमंत्री झाल्या आणि आता कॅबिनेट मंत्री झाल्या तरीही त्यांच्या राहणीमानात आणि स्वभावात कोणताही बदल झालेला नाही. प्रसंग ओळखून जबबादारीने वागणे मात्र वाढले. परवा अंगणवाडी सेविकांना देण्यात येणा-या साडय़ांवर सभागृहात लक्षवेधी होती आणि वर्षा गायकवाड तापामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल होत्या. तरीही डॉक्टरकडून एक तासाची परवानगी घेऊन त्या सभागृहात आल्या होत्या आणि महिलांसाठी महत्त्वाच्या या लक्षवेधीवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. महिला कोणत्याही क्षेत्रातील असो त्या एकत्र आल्या की एकमेकींच्या ड्रेस आणि साडय़ांबद्दल बोलणारच. त्याला इंदिरा गांधीसुद्धा अपवाद नव्हत्या. एखाद्या काँग्रेस कार्यकर्तीलाही तिच्या साडीबद्दल त्या विचारायच्या तेव्हा तमाम कार्यकर्त्या महिलांना इंदिराजींविषयी अधिक जिव्हाळा वाटायचा. त्या आपल्यातल्याच वाटायच्या. सोमवारी सभागृहातल्या या लेडीज क्लबमध्ये असाच जिव्हाळा निर्माण झाला होता.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP