Friday, April 1, 2011

मॅचनंतरची धमाल


क्रिकेटच्या विजयाची नशा अद्याप उतरली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी सभागृहात आला.अजित पवारांचे विरोधकांना उद्देशून फटकावलेले शाब्दिक चौकार-षटकार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी थेट शरद पवारांवर केलेला खळबळजनक आरोप यामुळे क्रिकेट मॅचनंतर झालेली धमाल सभागृहात सुरू झाल्याचे चित्र दिसले.

क्रिकेटच्या विजयाची नशा अद्याप उतरली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी सभागृहात आला. अजित पवारांचे विरोधकांना उद्देशून फटकावलेले शाब्दिक चौकार-षटकार आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी थेट शरद पवारांवर केलेला खळबळजनक आरोप यामुळे क्रिकेट मॅचनंतर झालेली धमाल सभागृहात सुरू झाल्याचे चित्र दिसले. अजितदादांच्या फटकेबाजीने सत्ताधारी बाकावर जल्लोष होत होता तर विरोधी पक्षनेते खडसे यांनी पवारांवर केलेल्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे काही सदस्य चांगलेच संतापले.
 
दोन दिवस अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी असे काही चौकार-षटकार मारले कीविरोधकांची बोलती बंद झाली. मॅच हरल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे जसे चेहरे झाले होतेतसे विरोधकांचे चेहरे गंभीर आणि हिरमुसले झालेले दिसले. अर्थसंकल्पाचे भाषण सुरू असताना विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घालून भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे संपूर्ण भाषण संपेपर्यत गोंधळ घातलातसेच यापूर्वीच्या अर्थमंत्र्यांची आणि सोनिया गांधीडॉ. मनमोहन सिंग यांची व्यंगचित्रे सभागृहात आणली होती. त्यावरून भाषणात व्यत्यय आणण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिवसेना भाजपाच्या नऊ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. विरोधकाच्या गदारोळामुळे संतप्त झालेल्या अजितदादांनी त्याचे उट्टे काढले.

यंदा गॉगलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यावरून अजितदादांनी चांगलीच टोलेबाजी केली. मनसेचे गोल्डन मॅन म्हणजे प्रत्यक्ष अंगावर लाखो रुपयांचे सोने परिधान करणारे आ. रमेश वांजळे यांच्या गॉगलची किंमतही लाखात असल्याची चर्चा आहे. भाषणाच्या वेळी घोषणा देणा-या वांजळेंना त्यांनी असा काही टोला लगावला की, त्यांना गप्प बसल्याशिवाय पर्याय नव्हता. वांजळेंचा गॉगल बघूनच गॉगलची किंमत वाढविली, असे त्यांनी ठणकावले. सभागृहात व्यंगचित्रे चिकटवण्यात आघाडीवर असलेल्या भाजप आमदार गिरीश महाजन यांनाही दादांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. अर्थमंत्र्यांच्या व्यंगचित्रांमध्ये माजी अर्थमंत्री व आता विधानसभा अध्यक्ष असलेल्या दिलीप वळसे-पाटील यांचेही व्यंगचित्र होते हा अध्यक्षांचा अवमान आहे. अध्यक्षांना भरपूर अधिकार असतात. बाळासाहेब भारदे अध्यक्ष असताना त्यांनी परदेशात गेलेल्या एका आमदाराला निलंबित केले होते. दादांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजन भलतेच गंभीर झाले. पुन्हा निलंबित करतात की काय? अशी भीती त्यांना वाटली असावी. सोनिया गांधी, डॉ. मनामोहन सिंग यांच्या व्यंगचित्रांवरून अजितदादांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि आदित्य साहेब तसेच मनसेचे राजसाहेब यांची व्यंगचित्रे लावलेली चालतील काय, असा खडा सवाल करून विरोधकांना त्यांनी साफ निरूत्तर केले. शिवसेनेच्या अंतर्गत भांडणाचीही त्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. शिवसेना गटनेते सुभाष देसाई आणि आमदार रवींद्र वायकर यांच्यात गटनेते पदावरून चांगलीच स्पर्धा रंगली आहे. वायकरांचे निलंबन केल्यामुळे देसाई गट खूष झाला होता. या गटाचे लोक निलंबन रद्द करूच नका, असे फोन करून सांगत होते, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला. खडसेंना उद्देशून तर तुम्ही ‘काँग्रेस पक्षात जाण्यास निघाला होता पण गोपीनाथ मुंडे दिल्लीत गेल्यामुळे तुम्हाला विरोधपक्षनेते पद मिळाले म्हणून तुम्ही थांबलात’ असा टोमणा अजितदादांनी मारला. अजितदादांची ही फटकेबाजी निमूटपणे सहन करणा-या खडसेंनी गृहविभागाच्या मागण्यांवर बोलताना चांगलाच प्रतिवार केला, त्यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केले. खडसेंच्या पवारांवरील आरोपांनी सभागृहातच नव्हे तर संपूर्ण विधानभवन परिसरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP