Monday, April 4, 2011

राजकारण्यांचे विमान पुराण


विमान प्रवासी असलेल्या या राजकारण्यांना आगामी निवडणुकीत गांधीगिरी तर नाहीच, दादागिरीही नाही. पण विमानगिरी मात्र नडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, त्यासाठी विमान पुराणातील सुरस कथा लोकांच्या मनात रुजविण्याएवढे नैतिक बळ राजकारण्यांमध्ये असले पाहिजे. राजकारणात सध्या त्याचाच अभाव निर्माण झाला असल्यामुळे पुराणातील वांगी पुराणातच बरी, असेच सर्वाना वाटत असावे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या नव्या विमान पुराणाला जन्म दिला आहे. विमानाचा आरोप करण्यापूर्वी जर त्यांनी नितीन गडकरींना परवानगी मागितली असती तर कदाचित हे पुराण अस्तित्वात आलेच नसते आणि याचे जनक होण्याचा मान त्यांना मिळाला नसता!

भारतात हिंदू धर्माने निर्माण केलेली 18 पुराणे आहेत. त्यात आणखी एका पुराणाची भर पडली आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांनी 19वे विमान पुराण अस्तित्वात आणले आहे. वीस वर्षापूर्वी शरद पवार हे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शर्माबंधूंना संरक्षण खात्याच्या विमानातून आणले असल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्या विमान प्रकरणाचा आरोप तत्कालिन विरोधी पक्षनेते व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी अशा खणखणीत शब्दांत आणि जोशपूर्ण आविर्भावात केला होता की, लोकांचा त्यावर पटकन विश्वास बसला होता. पवारांची प्रतिमा त्या आरोपाने चांगलीच काळवंडली होती. पण विमानात कोणाच्या तरी ओळखीने आलेली माणसे होती, त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहीत नव्हती,असा खुलासा पवारांनी केला होता. मोठय़ा आवाजात केलेला आरोप आणि लहान आवाजात झालेला खुलासा पाहिला की,आरोपावरच लोकांचा विश्वास बसू शकतो. आता पुन्हा विमान प्रवासाचा आरोप विद्यमान विरोधी पक्षनेते व भाजपचेच नेते एकनाथ खडसे यांनी केला असून तेव्हाचा आरोप आणि आजचा आरोप यात महद्अंतर आहे. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील आरोपी बलवा याच्या सोबत शरद पवारांनी विमानातून प्रवास केला, असा हा आरोप असला तरी या आरोपाचा आवाज पूर्वीच्या आरोपासारखा जोशपूर्ण नाही. तो बराच क्षीण झालेला दिसला. तो क्षीण होण्याचे कारणही जनतेला कळून चुकले आहे. ते असे की, आरोप करणारे विरोधी पक्षांचे नेतेगणदेखील आता विमानाचे सहप्रवासी होऊ लागले आहेत. ऊठसूठ शरद पवारांवर आरोप करणारे त्यांना वरचढ केव्हा झाले, ते उघड होऊ लागले आहे. अनेक प्रकारच्या घोटाळय़ांमध्ये सत्ताधाऱ्यांबरोबर एक तरी विरोधक असलाच पाहिजे एवढी परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ‘मिलजुलके खाओ’ असा वाक्प्रचार राजकारणात  रूढ होऊ लागला आहे.

खरे तर बलवाने पक्षभेद न करता सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना विमान दिले पाहिजे. कम्युनिस्ट, जनता दल, लालूंचा राष्ट्रीय जनता दल, ममतांचा तृणमूल काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (रामदास आठवले धावत जाऊन बसतील), बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या नेत्या व मुख्यमंत्री  मायावती यांनी तर खुशीने हे विमान घेतले असते. आदी अनेक पक्ष आहेत, या पक्षांच्या नेत्यांना बलवाने विमान का दिले नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. बलवाने अशी राजकीय अस्पृश्यता का पाळावी? ज्या पवारांशी बलवाचे संबंध आहेत, ते पवार सर्वपक्षीय मित्र म्हणून सर्वपरिचित आहेत. तेव्हा विमान प्रवासाबाबत बलवाने असा भेदाभेद करणे कोणाला रुचले नाही. परंतु डीबी रिअ‍ॅल्टी किंवा बलवा किंवा विनोद गोएंका यांच्याशी हे पक्ष कोणतेही संबंध ठेवत नसल्यामुळे त्यांना विमान मिळणार तरी कसे हाही प्रश्नच आहे. मात्र हे विमान प्रकरण विधान सभेत आले. प्रवाशांची नावे कामकाजाच्या नोंदीत आली त्यावर जोरदार चर्चा रंगली, आरोप-प्रत्यारोप झाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोपांचा खुलासा करण्याची जबाबदारी आली, पण ते जरा गडबडले. पवार हे बलवासोबत होते की नाही, हे तपासून पाहातो, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. पण राष्ट्रवादीने विमानाचे भाडे भरले असल्याचा खुलासाही त्यांनी केला.?या खुलाशामुळे लोकांची चांगलीच करमणूक झाली. बलवाच्या मालकीचे खासगी विमान,त्यात स्वत: बलवा त्यांच्या सोबत पवार आणि मित्रमंडळी असताना राष्ट्रवादीने विमानाचे भाडे भरले कसे? बलवा सोबत असताना त्याच्या वैयक्तिक वापरासाठी असलेल्या विमानाचे भाडे भरावे लागते का? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचेही बलवाशी संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी भाडे भरले केव्हा याचा खुलासा झालेला नाही. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंनी बलवाच्या विमानातून पाच वेळा प्रवास केल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. त्यावर ठाकरेंनी असा थयथयाट केला की, मूळ?आरोपाचे उत्तर देण्याऐवजी त्यांचे विमान भलतीकडेच भरकटले. बलवा काही  खास लोकांना विमान देतोच; पण काही खास लोकांना सोबत घेऊनही जातो. त्यामुळे अनेक प्रश्न आणि शंका-कुशंका उपस्थित झाल्या असून, ‘बलवा एअरवेज’चे प्रवासी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. आपल्यामुळे राजकारण कसे घुसळून निघू शकते, हेही बलवाला कळत नाही, जेव्हा पाहावे तेव्हा सगळय़ांना विमानातून घेऊन जात आहे. त्याच्या या विमानवाऱ्यांमुळे ‘बलवा बडा नादान’ म्हणण्याची वेळ?आली आहे. वस्तुत: बलवाने विजय मल्ल्याकडून धडे घेतले पाहिजेत,मल्ल्या खास लोकांना त्याच्या विमानाने पाठवतो आणि स्वत: मात्र ब्युटीक्विन्स बरोबर नौकानयन करतो. विमान प्रवासी असलेल्या या राजकारण्यांना आगामी  निवडणुकीत गांधीगिरी तर नाहीच, दादागिरीही नाही, पण विमानगिरी मात्र नडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, त्यासाठी विमान पुराणातील सुरस कथा लोकांच्या मनात रुजविण्याएवढे नैतिक बळ राजकारण्यांमध्ये असले पाहिजे. राजकारणात सध्या त्याचाचअभाव निर्माण झाला असल्यामुळे पुराणातील वांगी पुराणातच बरी, असेच सर्वाना वाटत असावे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या नव्या विमान पुराणाला जन्म दिला आहे. विमानाचा आरोप करण्यापूर्वी जर त्यांनी नितीन गडकरींना परवानगी मागितली असती तर कदाचित हे पुराण अस्तित्वात आलेच नसते आणि याचे जनक होण्याचा मान त्यांना मिळाला नसता!



विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आमदार निधीत वाढ आणि विश्वचषक क्रिकेट सामन्याची तिकिटे मिळावी, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंचे आमदार एकजुटीने आवाज उठवित होते. परंतु लोकांचे प्रश्न सोडविण्याबाबत एवढी जागरूकता दाखविली जात नाही. विश्वचषक जिंकण्याचे आव्हान क्रिकेटपटूंसमोर होते तसे सुरक्षा राखण्याचे आव्हान पोलिस दलासमोर होते. ते त्यांनी समर्थपणे पेलले.?पण त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गृह विभाग गंभीर दिसत नाही. मोहालीत झालेला भारत-पाकिस्तानचा उपांत्य सामना आणि मुंबईतील भारत-श्रीलंका अंतिम सामना या दोन्ही सामन्यांना त्या राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते. भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते राहुल गांधी दोन्ही सामन्यांना सुरक्षा कवच भेदून सर्वसामान्यांमध्ये बसण्याची हिंमत त्यांनी दाखविली. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस दलाचा  थरकाप उडाला.?पण पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आकर्षण असलेली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने ती अतिरेक्यांच्याही हिटलिस्टवर आहे. याचा अनुभव मुंबईकरांनी वेळावेळी घेतला आहे. दक्षिण मुंबईत वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामना होणार असल्याने चोख सुरक्षा ठेवणे अपरिहार्य होते. तशी व्यवस्था ठेवण्यासाठी मुंबई पोलिस, नौदल, तटरक्षक दल यांनी प्रचंड मेहनत घेतली. रात्रंदिवस 48 तास पोलिस रस्त्यावर होते. पण  या पोलिसांच्या समस्या सोडविण्याकडे गृहविभागाचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळेच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी गृहविभागावर चांगलेच ताशेरे मारले. बडय़ा अधिकाऱ्यांना घरांसाठी वाटेल तिथे भूखंड मिळतात, पण गरीब पोलिसांचा प्रश्न आला की नियमावर बोट ठेवले जाते. वास्तविक पाहता डावखरे हे गृहमंत्री आबा पाटलांचे मित्र म्हणून सर्वपरिचित आहेत. पण पोलिसांच्या प्रश्नावर त्यांनी आबांसाठी तडजोड केली नाही हे विशेष. कोणी कोणाच्या विमानात प्रवास करतो, कोणाचे विमान भरकटते. सगळे हवेत आहेत, पण डावखरेंनी आपण जमिनीवर असल्याचे याद्वारे दाखवून दिले. हेही नसे थोडके.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP