Friday, April 22, 2011

वाघाची झाली शेळी


अर्थसंकल्पी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या तथाकथित वाघाची पुरती शेळी झाल्याचे सभागृहाने पाहिले.

अर्थसंकल्पी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या तथाकथित वाघाची पुरती शेळी झाल्याचे सभागृहाने पाहिले. या सभागृहात शिवसेनेचा एक आमदार म्हणजे एक वाघ होता,त्याचे नाव छगन भुजबळ. त्यानंतर 1990 आणि 1995 मध्ये निवडून आलेल्या शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड जोशउत्साह आणि आक्रमकपणा होता. तो नंतरच्या काळात पूर्णपणे संपुष्टात आला. सभागृहात ठाकरे कुटुंबाचे नाव घेताच शिवसेना आमदार चवताळून उठत असत. त्या वेळच्या प्रत्येक आमदाराच्या मनात पक्षनेतृत्व आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असलेली नितांत श्रद्धा आणि आदर त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असे. कारण त्यावेळी शिवसेनेला बाजारू स्वरूप आलेले नव्हते. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नव्या नेतृत्वाने सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक गोष्ट सौदेबाजीने होऊ लागली. म्हणूनच नवे नेतृत्व आपल्याबद्दलचा आदर तर निर्माण तर करू शकले नाहीचउलट शिवसेनाप्रमुखांनी जे मिळवले होतेते सर्व नव्या नेतृत्वाने घालवले. म्हणून आता शिवसेनेचे आमदारही आपल्या नेतृत्वाकडे व्यावहारिक नजरेनेच पाहात असल्याचे दिसते. त्यांच्यात पक्षनेतृत्वाविषयी आदर आणि जिव्हाळा असल्याचे कृतीतून दिसून येत नाही. गुरुवारी त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले.

कोकणचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेत शिवसेना नेतृत्वावर कडाडून हल्लाबोल केला. मात्र त्याचा प्रतिकार करण्यासाठी शिवसेनेचा एकही आमदार सरसावला नाही. शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी आपल्या नेत्यांवरील आरोप परतवून लावण्याची केविलवाणी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला ना भाजपच्या आमदारांची साथ मिळाली ना स्वपक्षाच्या. गटनेते म्हणून आब आणि दरारा निर्माण करण्यात देसाई कधीच अयशस्वी ठरले आहेत. राणे यांनी शिवसेनेवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात खासगी उद्योजकांकडून प्रकल्प होऊ नये म्हणून पाचशे कोटी रुपयांचे डील झाल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. पाचशे कोटीच्या ऑफरनुसार पहिला हप्ता दिला. हप्ता मिळेपर्यंत जैतापूरमध्ये रॅली झालीच नाही. उद्धव ठाकरे यांची नऊ मार्चला आयोजित करण्यात आलेली रॅली नंतर नऊ एप्रिलला झाली. राणेंच्या या आरोपावर पाचशे कोटी नव्हे पाचशे रुपये घेतले असले तरी आम्ही कोणतीही शिक्षा भोगू अशा आशयाचे वक्तव्य देसाई यांनी केले. ते ऐकून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. गोंधळ नाही, गदारोळ नाही. त्यानंतर अजित पवार यांचे भाषण झाले. मग उशिराने शिवसेना आमदारांना जाग आली. रवींद्र वायकर उठले. म्हणाले, शिवसेना भवनात आंदोलनाचा कट रचला हे राणे यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाका. दोन दिवसांपूर्वी केलेला आरोप आज काढून टाका अशी मागणी करून वायकर यांनी स्वत:चे हसे करून घेतले. तर विनोद घोसाळकर राणेंच्या आरोपावर म्हणाले की, पुरावे दाखवा. त्यावर राणे यांनी योग्य वेळी दाखवतो, असे सांगताच पुन्हा सर्वजण चिडीचूप झाले. वाघाची खरोखरच शेळी झाली आहे, हेच खरे!

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP