Wednesday, April 20, 2011

राणेंचा दणका...


गोरगरिबांची माथी भडकून त्यांना रस्त्यावर उतरण्यास शिवसेनेनेच भाग पाडले. त्यामुळे गोळीबार आणि त्यातील मृत्यूस शिवसेनाच कारणीभूत असल्याचे राणे यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.


जैतापूर येथे झालेल्या गोळीबाराचे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत पडसाद उमटणे स्वभाविकच होते. गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारवर तोफ डागण्याची तयारी विरोधकांनी केली होती. गोळीबाराचे भांडवल करत शिवसेनेने रत्नागिरीत धुडगूस घातला आहे. तसेच सभागृहातही त्याचे भांडवल करण्याचा शिवसेना आमदारांचा प्रयत्न होता. मात्र कोकणचे नेते व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चौफेर फटकेबाजी करत तो हाणून पाडला. तेथील परिस्थितीचे वास्तव चित्रण सभागृहासमोर मांडून शिवसेना आमदारांचे दात त्यांच्या घशात घातले. त्यावर प्रतिक्रिया देण्याचेही बळ शिवसेनेत उरले नाही. दोन्ही सभागृहांत मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरावर मत मांडण्याचा अधिकार विरोधकांना असताना ती संधीही त्यांना घेता आली नाही. कारण त्यावर राणे यांच्यासमोर बोलणार काय? त्यांना राणेंनी आधीच निरुत्तर करून टाकले होते. विधानसभा आणि विधान परिषदेत कर्तव्य म्हणून याच चर्चेत भाग घेत नारायण राणे यांनी सर्वच प्रकल्पांना विरोध करता, मग विकास होणार कसा, असा सवाल करून परखड मते मांडली. विशेष म्हणजे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांना बोलण्यासाठी भरपूर वेळही दिला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांना चर्चेला उत्तर देण्याची घाई झाली होती. विधानसभेत तर ते उत्तरासाठी चार वेळा उभे राहिले. पण त्यांना अध्यक्षांनी खाली बसवले. राणे बोलण्याआधी गृहमंत्र्यांना खाली बसवले, तेव्हा चौथ्यांदा बसवता, असे पाटील यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. पण राणे यांनी हा विषय मांडण्यास सुरुवात केली आणि सभागृहाचा नूर पालटला.

गोरगरिबांची माथी भडकून त्यांना रस्त्यावर उतरण्यास शिवसेनेनेच भाग पाडले. त्यामुळे गोळीबार आणि त्यातील मृत्यूस शिवसेनाच कारणीभूत असल्याचे राणे यांनी सभागृहात ठणकावून सांगितले. गोळीबारात ठार झालेल्या माणसाबद्दल सहानुभूती वाटत असतानाच अशा भोळय़ा भाबडय़ा लोकांची माथी भडकवण्यात शिवसेनाच कशी जबाबदार आहे, हे राणे यांनी पटवून दिल्यामुळे विरोधकांची धार बोथट झाली.

जैतापूर प्रकल्प पूर्ण व्हावा, या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा तेथे इतर प्रकल्प सुरू झाल्याने कोकणी माणसाला लघुउद्योग मिळावा आणि त्याच बरोबर राज्याचा विजेचा प्रश्न सुटावा म्हणून राणे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या चर्चेला उत्तर देण्याची त्यांची जबाबदारी नसतानाही राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या चर्चेत भाग घेत विरोधकांच्या सर्व आक्षेपांचा समाचार घेतानाच गोळीबारामागील सत्यही सभागृहासमोर मांडले आणि एका तरुणाच्या मृत्यूस शिवसेनाच कशी कारणीभूत आहे, हे दाखवून दिले. हा प्रकल्प यशस्वी होणे हे कोकणच्या आणि राज्याच्या दृष्टीने कसे योग्य आहे हे पटवून देतानाच तिथे ज्यांचा संबंध नाही अशा काही संघटना आणि शिवसेना त्यात कसे अडथळे निर्माण करत आहेत, लोकांना कसे भडकवत आहेत, त्यासाठी बैठका घेऊन योजनाबद्धरीतीने कटकारस्थाने रचली जात आहेत, हेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आश्चर्य म्हणजे समोरच्या बाकावरून एकाही शिवसेना आमदाराने त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला नाही. एकानेही हरकतीचा मुद्दा उपस्थित केला नाही. जणू त्यांच्या मतांना विरोधकांची मूक संमतीच होती. राणे म्हणाले की, ‘‘काही दिवसांपासून शिवसेना तेथील लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करते आहे. शिवसेना कार्याध्यक्षांनी तिथे सभाही घेतली. तेथे त्यांनी केलेल्या 19 मिनिटांच्या भाषणात कोणते विकासाचे मुद्दे मांडले? कोकणी तरुणांच्या हिताच्या कोणत्या गोष्टी सांगितल्या? एकही नाही. फक्त तेथील तरुणांची माथी भडकवण्याचे काम त्यांनी केले. इतके करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी शिवसेना भवनात बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत ते काम बंद पाडा, असे फर्मान सोडले. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक आमदाराने  दोन दिवस रात्रभर प्रत्येक वाडय़ा-वस्त्यांत बैठका घेऊन लोकांना चिथावणी दिली. काही झाले तरी हे काम बंड पाडण्याचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी माथी भडकविल्यामुळे भोळे-भाबडे तरुण रस्त्यावर उतरले. याला आंदोलन म्हणावे का? कारण या तरुणांकडे झेंडे नव्हते, बॅनर नव्हते तर लाठय़ा, काठय़ा शिगा होत्या. त्यातील बहुसंख्य बाहेरून आलेले होते. त्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला. पोलिसांना जखमी केले. शेवटी नाइलाज झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला.’’ राणेंच्या या दणकेबाज भाषणानंतर विरोधकांची बोलतीच पुरी बंद झाली.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP