Thursday, March 31, 2011

विधानभवनातही मॅच फिव्हर


क्रिकेट पाहण्याची हौस भागवून घेण्यासाठी दोन्ही सभागृहे बंद ठेवण्यास विरोधकांनीही आनंदाने संमती दर्शवली. एरवी सत्ताधा-यांना ताटकळत ठेवण्याचा आनंद ते घेतात. पण विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीच सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन कामकाज लवकर आटोपते घ्यावे, अशी सूचना केली.

विधानातील सर्व वातावरण बुधवारी क्रिकेटमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जणू काही मॅच फिव्हरच्या साथीची लागणच विधानभवनाला झाली होती. कँटीनलॉबी आणि प्रेसरूममध्येही मॅचचीच चर्चा होत होती. हा सामना पाहण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे काम लवकर गुंडाळण्यात आले. क्रिकेट पाहण्याची हौस भागवून घेण्यासाठी दोन्ही सभागृहे बंद ठेवण्यास विरोधकांनीही आनंदाने संमती दर्शवली. एरवी सत्ताधा-यांना ताटकळत ठेवण्याचा आनंद ते घेतात. पण विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीच सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन कामकाज लवकर आटोपते घ्यावेअशी सूचना केली.
 
भारत-पाकिस्तान हे वास्तवात एकमेकांचे कट्टर विरोधक आहेततसेच ते क्रिकेटच्या मैदानातही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. ज्या-ज्या वेळी या दोन्ही संघांत सामना असतोत्या-त्या वेळेला दोन्ही देशांत त्याबाबत कमालीची उत्सुकता असते. पाकिस्तानात तर ही मॅच पाहता यावीयासाठी सरकारी सुट्टीच जाहीर केली आहे. मोहालीच्या सामन्याची चर्चा मंगळवारसूनच टिपेला पोहोचली होती. सभागृहात अनेक विषयांवर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांत वाद असले तरी क्रिकेट पाहण्यासाठी सभागृह बंद करण्यावर मात्र सर्वाचेच एकमत झाले. दररोज विधानसभेचे कामकाज सकाळी 11  वाजता सुरू होतेतर विधान परिषदेचे कामकाज 12 वाजता सुरू होत असते. मात्र सर्वाना लवकर घरी जाता यावेयासाठी बुधवारी सकाळी 10 वाजताच दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू करण्यात आले. विधानसभेचे कामकाज दुपारी एक वाजताच संपले,तर विधान परिषदेचे कामकाज अडीच वाजता अटोपते घेण्यात आले. सामना बघायचाम्हणून अनेकजण विधानभवनाकडे फिरकलेच नाहीत. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळत्यांचे पुत्र पंकज आणि विधान परिषदेतील भाजपचे आमदार विनोद तावडे मंगळवारीच मोहालीला रवाना झाले. जे सदस्य सभागृहात होतेत्यातील कुणालाच कामकाजात रस असल्याचे दिसत नव्हते. काही आमदारांना तर एवढा मॅच फिव्हर चढला होता कीआपणच क्रिकेट खेळणार आहोतअसा त्यांचा थाट होता. काँग्रेसचे आमदार निलेश पारवेकर आणि भाजपचे आमदार जयकुमार रावल तर सारे संकेत बाजूला सारून चक्क क्रिकेटचा टी शर्टच परिधान करून सभागृहात आले होते.

सभागृहात बुधवारचा दिवस अर्थसंकल्पावरील चर्चेचा दुसरा आणि अखेरचा होता. अर्थसंकल्पावरील चर्चा संपवून अर्थमंत्री विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री विधान परिषदेत चर्चेला उत्तर येणार होते. पण चर्चा अर्धवट ठेऊन त्याचे उत्तरही उद्यावर ढकलण्यात आले. दुपारी १ वाजता विधानसभेचे कामकाज संपलेतेव्हा आमदारमंत्रीपीठासीन अधिकारी मॅच कोण जिंकणार याचीच चर्चा करत होते. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील सभागृहाबाहेर आले तेव्हा आमदारांनी त्यांच्याभोवती कोंडाळे केले. साहेब मॅच कोण जिंकणारअसा प्रश्न करून कागदांचा माईक करून त्यांच्यासमोर धरण्यात आला. मॅच पाहण्याची उत्सुकता लागलेले आमदार लगबगीने विधान भवनाबाहेर पडले.

विधान परिषदेतील माहोलही क्रिकेटमय झाला होता. अर्थसंकल्पावर चर्चा करणा-या सदस्यांच्या मुखातून षटकारचौकर,गुगली असे शब्द वारंवार येत होते. भाजपचे तरुण आमदार धनंजय मुंडे यांनी तर भाषणाची सुरुवात करताना अत्यंत मार्मिक टिप्पणी केली. हेमंत टकले यांच्यानंतर ते भाषणाला उभे राहिले होते. ते म्हणाले की, ‘‘टकले साहेबांचे वक्तृत्व चांगले होते. मात्र खराब मैदानावर एखाद्या कसलेल्या खेळाडूला आपले कसब दाखवताना जी कसरत करावी लागतेती टकले यांना करावी लागत होती.’’ नंतर मोर्चा काँग्रेसचे भाई जगताप यांच्याकडे वळवताना ते म्हणाले,  ‘‘भाईंचीही तशीच अवस्था झाली होती. अर्थसंकल्पात सांगण्यासारखे काही नसल्यामुळे भाईंना हातवारे करण्यावरच जास्त भर द्यावा लागला होता. शेवटी मात्र त्यांनी चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखाद्या खेळाडूने नो बॉलवर षटकार मारावातशी फलंदाजी त्यांनी केले.’’
 मुंडे यांच्या बोलण्यात क्रिकेटचेच संदर्भ जास्त येऊ लागले तेव्हा उपसभापती वसंत डावखरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘तुम्ही अर्थसंकल्पावरील भाषण करत आहात की क्रिकेटची कॉमेंट्री?’’ त्यांच्या बोलण्यावर सभागृहात एकच हशा पिकला. एकंदर बुधवारचा दिवस फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचाच होता.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP