हसन अली... खलीबली
हसन अली प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची खळबळ माजली असून त्याचे पडसाद सभागृहाच्या दोन्ही सभागृहांतही उमटले.
मंगळवारीही याच मुद्दय़ावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणी सभागृहात निवेदन केले. हसन अलीची जी टेप प्रसिद्ध झाली आहे, ती जशीच्या तशी नाही तर त्यात बदल केला आहे. देशभ्रतार यांनी त्यातील सरकारला अडचणीचा असणारा तेवढाच भाग त्यात ठेवला आहे. त्यांना हसन अली प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी हसन गफूर यांच्या नियुक्तीचे प्रश्न अलीला विचारले. हसन गफूर यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नेमणूक करण्यासाठी हॉटेल सेंटॉर येथे बैठक झाली. त्याला मी, तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि हसन अली उपस्थित असल्याचा जो उल्लेख आहे तो निखालस खोटा आहे. हे जर सिद्ध झाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, इतकेच नव्हे तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल, असे आव्हानच त्यांनी दिले. यावर विरोधकांची बोलती बंद होईल, अशी आर. आर. पाटील यांची अपेक्षा होती. मात्र जितक्या ठोसपणे आर. आर. पाटील यांनी उत्तर दिले तितक्याच ठामपणे भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही आव्हान दिले की, माझे विधान खोटे निघाले तर मी राजीनामा देईल. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली तेव्हा सभागृहातील राष्ट्रवादीचे आमदार गृहमंत्र्यांच्या मदतीला धावून आले. नेहमी सभागृह बंद पाडण्यासाठी विरोधक पुढे येताना पाहायला मिळते. मात्र मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार त्यात आघाडीवर दिसले. जणू या प्रकरणाची सविस्तर चर्चा होऊ नये यासाठीच त्यांचा आटापिटा असावा, असे दृश्य सभागृहात दिसत होते. अखेर कामकाज करणे अशक्य झाल्याने अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
या प्रकरणाला एवढा राजकीय रंग प्राप्त झाला की, सभागृहाचे कामकाज तहकूब होताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्या सोबत पत्रकार कक्षात आले. पत्रकारांना त्यांनी सांगितले की, हसन अली प्रकरण दिसते तितके साधे नाही. या प्रकरणाशी महाराष्ट्रातील तीन मुख्यमंत्र्यांचा संबंध आहे. तसे वृत्त दिल्लीतील एका वृत्तपत्रात प्रसिद्धही झाले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, केंद्रातील सक्तवसुली संचालनालयाच्या आयुक्तांनीच तीन मुख्यमंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांचा हसन अलीशी संबंध असल्याचा गोपनीय अहवाल सुप्रिम कोर्टात दिला आहे. त्यामुळे ते तीन मुख्यमंत्री कोण, कोणत्या कालावधीत हे घडले याची चर्चा विधान भवनात सुरू झाली. सुप्रिम कोर्टात ती नावे जाहीर होणार असल्याचे पिल्लू खडसेंनी सोडले होते. त्यामुळे उत्सुकता आणखी ताणली गेली.
0 comments:
Post a Comment