Wednesday, March 30, 2011

अंगणवाडीची साडी


अंगणवाडी सेविकांना देण्यात येणा-या साडय़ांतही घोळ होत असल्याचे उघड झाले असून त्यांना चांगल्या दर्जाच्या साडय़ा देण्याऐवजी त्यात घोळ आणि घोटाळे झाल्याचे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले.

ग्रामीण भागातील बालक आपल्या जीवनातील पहिलं पाऊल टाकते ते अंगणवाडीमध्ये. तेथील अंगणवाडी सेविकांच्या हातात भारताचे भावी नागरिक जीवनातील पहिले धडे गिरवित असतात. अंगणवाडीतील मावशी’ या बालकांच्या अत्यंत आवडत्या असतात. त्यांना मुळाक्षरे गिरवण्यास शिकविण्यापासून ते पोषण आहार देण्यापर्यंतची जबाबदारी या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीसांकडेच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी यापूर्वी विधानभवनावर मोर्चेही आणले आहेत. असा संघर्ष केल्यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या. मात्र त्यांना देण्याचे जे कबूल केलेते त्यांच्यापर्यंत नीट पोहचतच नाही. अगदी त्यांना देण्यात येणा-या साडय़ांतही घोळ होत असल्याचे उघड झाले आहे. त्यांना चांगल्या दर्जाच्या साडय़ा देण्याऐवजी त्यात घोळ आणि घोटाळे झाल्याचे प्रकरण विधानसभेत चांगलेच गाजले.

विधिमंडळाच्या कामकाजावर विरोधी सदस्यांनी चार दिवसांपासून बहिष्कार घातल्याने सर्वाचेच लक्ष विरोधकांच्या भूमिकेकडे होते. विधानभवनाच्या दारात विरोधी सदस्यांचे धरणे आंदोलन सुरू होते. सभागृहाबाहेर असे राजकीय वातावरण तापलेले असताना विधानसभा सभागृहात मात्र अंगणवाडींच्या सेविकांची साडी गाजत होती. अंगणवाडी सेविकांना देण्यात येणा-या साडय़ांमध्ये मोठा घोळ झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना सोलापूरचे आमदार बबनदादा शिंदे विधानसभेत उपस्थित केली होती. खरं तर ही लक्षवेधी गुरुवारच्या कामकाजात दाखवलेली होती. या विषयावर चर्चा होईलतेव्हा किती निकृष्ट आहेतहे दाखवण्यासाठी शिंदे यांनी दोन साडय़ाही बरोबर आणल्या होत्या. शेकापच्या आमदार मीनाक्षीताई पाटील महिलांच्या विषयावर मोठय़ा पोटतिडकीने बोलतात. म्हणून शिंदे यांनी या दोनपैकी एक साडी मीनाक्षीताईंकडे दिली. मात्र त्या साडय़ांचे दुर्दैव असे कीआणलेल्या साडय़ा त्या दिवशी सभागृहात दाखवताच आल्या नाहीत. कारण विरोधी सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार घातल्यामुळे ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली होती. संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार घालण्याची घोषणा विरोधी सदस्यांनी केली असल्याने आता ही लक्षवेधी सभागृहात येणारच नाही असे समजून शिंदे यांनी ती साडी शिपायाला दिली,त्याने ती आपल्या पत्नीला दिली. तर मीनाक्षीताईंनी ती साडी काम करणाऱ्या एका महिलेला दिली. त्यामुळे नेमकी लक्षवेधी सभागृहात चर्चेसाठी आलीतेव्हा साडी दाखवण्याऐवजी ती किती निकृष्ट दर्जाची आहेयाचे वर्णन करण्यासाठी त्यांना शब्दांची जमवाजमव करावी लागली. गणपतराव देशमुखदिलीप सोपलदिलीप माने आदी सदस्यांनी साडय़ांमध्ये झालेला घोळ सभागृहात बराच वेळ घोळवला. मीनाक्षीताईंना खूप बोलायचे होते. त्या सारख्या बोलण्यासाठी हात वर करत होत्या. पण त्यावेळी दिलीप माने बोलत होते. दिलीप सोपल मध्येच हस्तक्षेप करून अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना म्हणाले की, ‘‘ताईंना प्रश्न विचारू द्या, त्यांना साडीतले कळते.’’ त्यावर दिलीप मानेंनाही साडीतले जास्त कळतेअशी मिश्कील टिप्पणी अध्यक्षांनी केली.


खरं तर कोणत्याही महिलेला आपल्या पसंतीचीच साडी आवडते. अनेकदा नवऱ्याने आणलेली साडीही आवडत नाही. तिथे सरकारने घेतलेली साडी कशी आवडावी? अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गणवेश म्हणून देण्यात येणा-या साडीचा रंग तरी किमान त्यांना विचारायला हवा होता. तोही विचारला नाही. गुणवत्ता नाही आणि रंगही नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष तर वाढलाच पण ज्या हातमाग महामंडळाने आणि आनंदी या खासगी संस्थेने साडय़ा पुरवल्या, त्यांनी त्यात घोळ केल्याचीही चर्चा सुरू झाली. हा खरोखरच घोटाळा होता, याचा पर्दाफाश सभागृहात झाला. महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यमंत्री फौजिया खान या दोन्ही महिला असल्यामुळे त्यांनी त्यावर निर्णय दिला. साडीमागे दोनशे रुपये थेट अंगणवाडय़ांनाच देण्याचे आश्वासन दिले. पण त्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद होणार की कोणत्या मार्गाने त्यांना पैसे मिळणार हे मात्र स्पष्ट झाले नाही.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP