Wednesday, March 16, 2011

आग लागली; पण


केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीचे प्रकरण विधानसभेत उकरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या संपूर्ण दुस-या दिवसाचे कामकाज तहकूब झाले. अर्थसंकल्पी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यात वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा घडवून राज्यातील जनतेला न्याय दिला पाहिजे.

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही।

मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिए।

तेरे सीने में नही तो मेरे सीने में सही।

हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी हा शेर जाहीर सभेत सुनावला. मात्र भाजपच्या सदस्यांनी मंगळवारी सभागृहात जो हंगामा खडा केला त्याने कोणती ‘सुरत’ बदलणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. केंद्रीय दक्षता आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीचे प्रकरण विधानसभेत उकरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या संपूर्ण दुस-या दिवसाचे कामकाज तहकूब झाले. अर्थसंकल्पी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यात वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा घडवून राज्यातील जनतेला न्याय दिला पाहिजे. मंगळवारी विधानसभा प्रश्नोत्तरांच्या यादीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा‘आदर्श गृहनिर्माण सोसायटी’चा प्रश्न होता. या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडून प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची नामी संधी असताना विरोधकांनी केंद्राच्या अखत्यारितील प्रश्न उपस्थित करून सभागृहाचा वेळ विरोधकांनी वाया घालवला. राज्यातील जनतेच्या जिव्हाळय़ाचे महागाई, पेट्रोल-डिझेल यासारखे प्रश्न असताना गल्ली सोडून दिल्लीत स्वारी करण्याचे मनसुबे विरोधकांनी रचले. त्यातही शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये समन्वय नसल्याचे दर्शन पहिल्याच तासात घडले. सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी थॉमस प्रकरणी सभागृहाचे कामकाज तहकूब करून चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी नियमांवर बोट ठेऊन सांगितले की,केंद्रीय दक्षता आयुक्त हा विषय केंद्राच्या अखत्यारितील आहे. हा विषय राज्यच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे तो या सभागृहात मांडता येणार नाही. ज्या नियम ५७ अन्वये हा विषय उपस्थित केला आहे, त्याच्या कक्षेत हे प्रकरण येत नाही. मूळ प्रश्नोत्तराचा तास हा सभागृहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो होऊ द्यावा. छापील प्रश्नोत्तरांमध्ये दाखवलेला पहिलाच प्रश्न ‘आदर्श सोसायटी’ संदर्भातला आहे. मी जर प्रश्नोत्तराचा तास रद्द केला, तर कुणाला तरी वाचवण्यासाठीच तसे केल्याचा आक्षेप येऊ शकतो. म्हणून प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा, असे आवाहन वळसे-पाटील यांनी केले. मात्र खडसे यांनी आग्रह कायम ठेवला. त्यामुळे खडसेच कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय, अशी कुजबूज सुरू झाली. पण वळसे-पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारलाच. पहिला प्रश्न ‘आदर्श सोसायटी’चा होता आणि तो शिवसेना सदस्यांनी विचारलेला होता. त्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेना आमदार सूर्यकांत दळवी प्रश्न विचारण्यासाठी उभेही राहिले. पण भाजप सदस्यांनी आपला गोंधळ कायम ठेवला. या गोंधळातच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज एक तासासाठी तहकूब केले.

पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा गणपतराव देशमुख यांनी वन हक्क जमिनीच्या मागणीसाठी नंदूरबार, नाशिक, गडचिरोली येथून आदिवासी चालत आले आहेत. याबाबत स्थगन प्रस्ताव दाखल करून घ्यावा, किमान सरकारने याबाबत निवेदन करावे, अशी मागणी केली. त्यावर वनमंत्री पतंगराव कदम यांनी याबाबत मंत्रालयात बैठक बोलवल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यानंतर गिरीष बापट यांनी बाबा आढाव हजारो प्रकल्पग्रस्तांसह चालत पुण्याहून आले असल्याची माहिती सभागृहात दिली. पतंगराव कदम यांनी त्यांचीही बैठक बोलाविली असून बाबा आढाव यांच्याशी चर्चेद्वारे विषय समजावून घेऊ, असे सांगितले. त्यानंतर खडसे यांनी पुन्हा स्थगनद्वारे थॉमस प्रकरण सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्याला अध्यक्षांनी परवानगी नाकारताच शिवसेना-भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. खरे तर या प्रकरणी चर्चा करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी होती. सभागृहात भूमिका मांडायलाही ते तयार होते. असे असताना त्यांचे ऐकून न घेता केवळ हंगामा करण्यासाठीच थॉमस प्रकरण सभागृहात उपस्थित केले गेले. गडकरी यांनी जाहीर सभेत लावलेली आग विरोधी सदस्यांमध्ये भडकली आणि त्यातूनच हंगामा झाला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP