विरोधक चीत, सरकारची जीत
विरोधकांनी थॉमस प्रकरणी केलेला हंगामा बुधवारीही सुरू राहील, असे वातावरण निर्माण केले होते. परंतु, सत्तेचा भरपूर अनुभव असलेल्या सरकारने विरोधकांची चांगलीच दांडी गुल केली. विधानसभा अध्यक्षांनी एकीकडे शिस्तीचे धडे दिले तर संसदीय कार्यमंत्र्यांनी राजकीय डावपेच आखून विरोधकांचा असा ‘मामा’ केला की त्यांना शिस्तीत काम सुरू करावे लागले.
विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे सभागृहाचा हेडमास्तर असतो. दिलीप वळसे-पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रत्येक वेळी आपल्या अधिकाराचा त्यानी योग्य वापर केल्याचे दिसले. ते तरुण असले तरी आपल्याला मिळालेले अधिकार,अनुभव आणि व्यासंग यांच्या बळावर त्यांनी कामकाजाचा ठसा पहिल्या वर्षातच सभागृहात उमटवला आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे पुढील कामकाज सुरळित पार पाडण्यात संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विरोधकांना चर्चेत गुंतवून या प्रकरणी सभागृहात निर्माण झालेली कोंडी फोडली तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशा राणा भीमदेवी गर्जना करणा-या विरोधकांनाच या निवेदनासाठी काही दिवस सरकारला वेळ देण्यास राजीही केले. असे निवेदन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना पक्षश्रेष्ठींशीही सल्ला-मसलत करण्यास वेळ मिळाला. अनेक वर्षे संसदीय कार्यमंत्रिपदाचा अनुभव असल्याने राजकीय चाल चांगलीच यशस्वी झाली. त्यामुळे विरोधक चीत आणि सरकारची जीत, असे चित्र निर्माण झाले.
0 comments:
Post a Comment