मुलांची नावे काहीही असली तरी अनेकदा त्यांना लाडाने बबडी.. छबडी.. असे म्हणून हाक मारली जाते. जसे आपल्या मुलांवर आपले प्रेम असते तसेच या मुंबई शहरावर इथे राहणा-यांचे प्रेम आहे. म्हणूनच ते मुंबईला लाडाने बंबई.. बॉम्बे म्हणतात, असा शोध विधान परिषदेत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्या विद्या चव्हाण यांनी लावला.
मुलांची नावे काहीही असली तरी अनेकदा त्यांना लाडाने बबडी.. छबडी.. असे म्हणून हाक मारली जाते. जसे आपल्या मुलांवर आपले प्रेम असते तसेच या मुंबई शहरावर इथे राहणा-यांचे प्रेम आहे. म्हणूनच ते मुंबईला लाडाने बंबई.. बॉम्बे म्हणतात, असा शोध विधान परिषदेत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्या विद्या चव्हाण यांनी लावला. विद्याताईंच्या लडिवाळ भावना ऐकून सदस्यांना मोठी गंमत वाटली. मात्र शिवसेनेचे गटनेते दिवाकर रावते नेहमीप्रमाणेच संतप्त झाले. मुंबईला बबडी .. छबडीप्रमाणे बंबई मुंबई म्हणणा-यांची अक्कल आम्हाला कळली. या मुंबईत जन्मलेली मराठी व्यक्ती असे म्हणते,हे ऐकून मला माझीच लाज वाटली, असे रावते म्हणाले. तेव्हा सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.
विधान परिषदेत राज्यपालाच्या भाषणावरील चर्चेचा दुसरा दिवस होता. या चर्चेत भाग घेताना दिवाकर रावते यांनी नेहमीप्रमाणे मराठीचा राग आळवला. या राज्याची भाषा मराठी आहे. इथला कारभार मराठीत चालला पाहिजे, असा आग्रह मी वारंवार धरत आहे. तसे आदेशही दिले जातात. मात्र कारभारात कोणताही बदल होताना दिसत नाही. सर्व सरकारी जाहिराती मराठीतच असल्या पाहिजेत, सरकारी कार्यालयांची नावे तरी मराठीत असली पाहिजेत. पण सांगायला लाज वाटते की एवढे करूनही हे अधिकारी मराठीचा वापर करायला तयार नाहीत, असे सांगून रावते यांनी काही कार्यालये आणि पोलिस ठाण्यांच्या बोर्डाची छायाचित्रेच सभागृहात फडकवली. या फलकांवर मुंबईऐवजी बॉम्बे, बंबई असा उल्लेख आहे. पुन्हा पुन्हा सांगूनही हे अधिकारी का ऐकत नाहीत. अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे, असेही रावते संतापाने म्हणाले. असे का घडते, हे सांगताना ते म्हणाले, राज्याच्या मोक्याच्या ठिकाणी परप्रांतीय अधिकारी बसलेले आहे. त्यांना या महाराष्ट्राबद्दल आणि मराठीबद्दल अजिबात प्रेम नाही. केवळ महाराष्ट्रात मलिदा खाण्यासाठी ते आले आहेत. ही आगपाखड ते करू लागले तेव्हा राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदार विद्या चव्हाण यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ अधिका-यांना केवळ मलिदा खाण्यासाठी येतात असे म्हणणे त्यांचा अपमान आहे. मुंबईच्या विकासात सर्वाचाच वाटा आहे. तेही इथे येऊन मेहनत करतात. उलट त्यांनी केलेल्या मेहनतीवर तुम्ही मलिदा खात आहात. आपल्या लहान मुलांचे नाव काहीही असले तरी त्यांना आपण बबडी.. छबडी .. म्हणून हाक मारतो. तसे लाडाने मुंबईला बंबई-बॉम्बे असे म्हणतात. एका शहराला अनेक नावाने पुकारले जाते, त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
त्यावर रावते अधिकच संतप्त झाले. बसा आता, तुमची अक्कल कळली. मराठी माणसेच असे बोलतात तेव्हा लाज वाटते. या सदनात ठराव करून बॉम्बेचे मुंबई करण्यात आले आहे. तरी तुम्हाला मुंबई म्हणायला शरम का वाटते? हा ठराव तुम्हाला मान्य नाही का, असा सवाल रावते यांनी केला. सभागृहाती ज्येष्ठ सदस्य अरुण गुजराथी यांनी रावते यांचा ‘लाज’हा शब्द कामकाजातून काढून टाकावा, अशी विनंती उपसभापती वसंत डावखरे यांना केली. डावखरे यांनी लाज शब्द कामकाजाच्या नोंदीतून काढून वादावर पडदा टाकला. याच चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे सदस्य सुरेश नवले यांनीही रावते यांना टोला लगावला. नवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना ‘निश्चयाचा महामेरू.. सकल जणांशी आधारू..’ हा रामदास स्वामींचा श्लोक म्हटला. त्यावेळी रावते कुत्सितपणे हसले. तेव्हा नवलेंनी ‘रावते सर्व तुम्हाला एकटय़ालाच कळते,असे समजण्याचे कारण नाही. या सभागृहातही अनेक विद्वान लोक आहेत, हे ध्यानात ठेवा, असा टोला लगावला. भाषणाचा समारोप करतानाही त्यांनी समाजासमाजात दरी पसरवणाऱ्यांना चांगलेच खडसावले. ते म्हणाले ‘कापसावर,पिकावर किड पडली तर त्याचा नाश करणारी औषधे शोधून काढली आहेत. समाजासमजात दरी पसरविणारी जी जातीयवादी कीड आहे ती नष्ट करण्यासाठीही सरकारने औषध शोधून काढावे.’ त्यांच्या वाक्यावर सभागृहात एकच खसखस पिकली. दोन्ही सभागृहांत राज्यपालांच्या अभिभाषणावरील दोन दिवसांची चर्चा संपवून आमदार होळीसाठी आपापल्या मतदारसंघात रवाना झाले. सोमवारी सभागृह पुन्हा सुरू होईल तेव्हा मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देतील.
0 comments:
Post a Comment