शिमग्याला दिवस बाकी आहे. मात्र त्या आधीच शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत बोंब ठोकली. कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात सभागृहात बोंब मारली गेल्याची ही पहिलीच घटना असावी.
शिमग्याला दिवस बाकी आहे. मात्र त्या आधीच शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत बोंब ठोकली. कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात सभागृहात बोंब मारली गेल्याची ही पहिलीच घटना असावी. ज्या कारणासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बोंब ठोकली तीही महाराष्ट्रातील इतर कोणत्याही प्रश्नासाठी नव्हे, तर ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेचे लोक पाण्यात पाहतात, त्या मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीचे निमित्त करून. विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाले. तारांकित प्रश्नांमध्ये कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीसंदर्भात प्रश्न होता. विशेष म्हणजे तो शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी विचारलेला होता. त्यांच्यासोबत शिवसेना आणि मनसेच्या आमदारांचीही नावे होती. सकाळी छापिल तारांकित प्रश्नांची यादी पत्रकारांच्या हाती पडली तेव्हाच हा प्रश्न पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-मनसे ‘आपण दोघे भाऊ भाऊ, महानगरपालिका मिळून’ खाऊ अशा भूमिकेत आहेत. शिवसेनेला सत्तेपासून रोखणे तिथे मनसेला सहज शक्य होते. मात्र त्यांनी तसे न करता शिवसेनेचा महापौर होऊ दिला आणि विरोधी पक्षनेतेपद घेतले. दोन्ही पक्षांत गुपचूप समझोता झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. गुरुवारी मनसे आमदारांच्या मारहाणीचा प्रश्न शिवसेना आमदारांनी लावून धरल्याचे दृश्य पाहिल्यानंतर मोठा भाऊ लहान भावाच्या मदतीला धावून गेला, असे वाटले आणि यांच्यात मिलीभगत आहे की, काय अशी शंकाही घेतली जाऊ लागली.
हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करणा-या अधिकाऱ्यांना निलंबित करा, त्यांच्यावर कारवाई करा, अशा घोषणा विरोधक देऊ लागले. खरे तर ज्या त-हेने हर्षवर्धन जाधव यांना मारहाण झाली आहे, ती पाहता त्या अधिका-यांवर कावाईची घोषणा करण्यास गृहखात्याला कचरण्याचे काहीही कारण नव्हते. गृहमंत्री त्या संदर्भात घोषणा करत नव्हते तेव्हा जाधव यांना मारहाण करण्यापूर्वी संबंधित अधिका-यांनी गृहमंत्र्यांची परवानगी घेतली असावी आणि म्हणूनच ते कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा आरोप करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. कामकाज करणे अशक्य झाल्याने दोन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. तिस-यांदा उपसभापतींनी कामकाज सुरू केले, तेव्हा पुन्हा विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या गोंधळातच संसदीय कार्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा नियमन विधेयक सभागृहात मांडण्यास अनुमती मिळविली, तर प्रादेशिक नगररचना विधेयक गोंधळातच मंजूर करून घ्यायला सुरुवात केली. गोंधळात सरकार कामकाज आटोपून घेत असल्याचे लक्षात येताच विरोधक आक्रमक होत अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले. तरीही संसदीय कार्यमंत्री कामकाज उरकत आहेत, असे पाहिल्यानंतरशिवसेनेच्या आमदारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आसनासमोरच जाऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. शिवसेनेच्या एका सदस्यांनी तर चक्क बोंब मारली. लगेच अन्य दोन-चार सदस्यांनी त्याचे अनुकरण केले. शनिवारी होळी पेटणार आहे, परंतु त्यापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांनी मनसेच्या आमदारासाठी बोंब मारली. मनसे शिवसेनेला भविष्यात बोंबच मारायला लावणार आहे, त्याची सुरुवात विधानसभेतून झाली असावी, अशी मार्मिक प्रतिक्रिया पत्रकार कक्षात उमटली.
विधानसभेत बुधवारी पहिलाच तारांकित ‘आदर्श गृहनिर्माण सोसायटी’तील घोटाळय़ाचा असूनही विरोधकांनी थॉमस प्रकरण लावून धरत आदर्शला बगल दिली. विधान परिषदेत मात्र गुरुवारी या प्रकरणावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब झाले. अखेर याविषयी चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शवल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अशी होळी सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या दालनात मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळीचा उत्साह दिसत होता. अभिष्टचिंतनासाठी येणा-यांचे तोंड साता-याचे कंदी पेढे आणि केक देऊन गोड केले जात होते. त्यामुळे विधानभवनाने एकाच दिवशी होळी आणि दिवाळी अनुभवली.
0 comments:
Post a Comment