Thursday, March 24, 2011

विरोधकांचा शिमगा


अर्थसंकल्पाच्या रुक्ष भाषणाला काव्य आणि शेरोशायरीची झालर देऊन ते हलकेफुलके करणे त्यांना जमले नाही. विरोधकांनी घोषणाबाजी करताना अनेकदा चक्क बोंबा मारल्या आणि सभागृहात शिमगा केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी होळी संपून दोन दिवस झाले. आता गप्प बसा, अशा शब्दांत त्यांना फटकारले.


महाराष्ट्राच्या विधानसभेत बुधवारी अघटीत घडले. विरोधकांनी सर्व प्रथा-परंपरांचे उल्लंघन करून टाकले. विधिमंडळात अर्थसंकल्प आणि त्यासंबंधीच्या कामकाजाला मोठी प्रतिष्ठा आणि महत्त्व आहे. वित्त-विधेयक जर नामंजूर झाले तर सरकार पडू शकते. एवढे वजन अर्थसंकल्पाला असते आणि याची सर्व सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना जाणीव असते. तरीही विरोधी सदस्यांनी अर्थसंकल्पी भाषणामध्ये एवढा व्यत्यय आणला की, अर्थसंकल्पाचे संपूर्ण भाषण होईपर्यंत घोषणाबाजी करून त्यांनी गोंधळ घातला. तरीही अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या गोंधळाकडे दुर्लक्ष करत आणि चित्त विचलित होऊ न देता भाषण केले. विरोधी आमदारांनी सुरू केलेल्या गोंधळात आणि उच्चरवात केलेल्या घोषणाबाजीतही अजितदादांचा आवाज सरस ठरला. मात्र अर्थसंकल्पाच्या रुक्ष भाषणाला काव्य आणि शेरोशायरीची झालर देऊन ते हलकेफुलके करणे त्यांना जमले नाही. विरोधकांनी घोषणाबाजी करताना अनेकदा चक्क बोंबा मारल्या आणि सभागृहात शिमगा केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी होळी संपून दोन दिवस झाले. आता गप्प बसा, अशा शब्दांत त्यांना फटकारले.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होण्यासाठी आमदार इतके उतावीळ झाले आहेत की त्यांना सभागृहांच्या प्रथापरंपरांचाही विसर पडू लागला आहे. याच मुद्यावर विरोधी आमदारांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी असाच रडीचा डाव खेळला होता. कामकाजात दाखवलेल्या दोन चर्चा पुढे ढकलून पाच वाजता सभागृहाची बैठक तहकूब करण्याचे ठरले होते. मात्र सभागृह बंद होण्यास काही मिनिटे असताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उकरून काढला आणि गोंधळ घालून सभागृह रात्री बारा वाजेपर्यंत चालवण्याचा विक्रम केला.


बुधवारीही त्यांनी बरोबर अर्थसंकल्पाचा मोका साधून पुन्हा शिळय़ा कढीला ऊत आणून तोच विषय उपस्थित केला. राज्याचा अर्थसंकल्प सुरू असताना सभागृह तहकूब करता येत नाही
, अर्थसंकल्प पुढे ढकलता येत नाही, ही वेळ लक्षात घेऊन सभागृहात गोंधळ घालण्याची कूटनीती अवलंबण्यात आली. मात्र त्यामुळे राज्याच्या आदर्श संसदीय परंपरा त्यांनी पायदळी तुडवल्या. अर्थसंकल्पात राज्याच्या विकासाचा आराखडा मांडलेला असतो. विरोधी सदस्यांनी अर्थसंकल्पावरील भाषण ऐकावे आणि त्यावर सरकारला विधायक सूचना कराव्यात, वेळप्रसंगी टीका करावी, अशी अपेक्षा असते. त्यासाठी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तो नीट ऐकणे गरजेचे असते. मात्र आज अजित पवार अर्थसंकल्प वाचत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ घातल्याने तो कुणालाही नीट ऐकता येत नव्हता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे अनेक सदस्यही आपसात गप्पा मारत होते. राज्याच्या संसदीय परंपरेत अर्थसंकल्पाच्या वेळी विरोधकांनी असा गोंधळ घालण्याची ही पहिलीच घटना. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना याबाबत पत्रकारांनी छेडले, तेव्हा आपल्यालाही झाला प्रकार मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आमदारांच्या भावना तीव्र असल्याने त्यांच्या प्रतिक्रया सभागृहात उमटल्या अशी बतावणी त्यांनी केली. यावरून विरोधी पक्षनेत्याचा आदरयुक्त धाक आमदारांना नाही, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.विरोधी पक्षाने अशा प्रकारे प्रथा-परंपरांना हरताळ फासला असतानाच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीही काही संकेत बाजूला ठेवले. आजपर्यंतचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येताना विशिष्ट कोट, त्यावर एखादं गुलाबचं फूल लावून ऐटीत येत. अजित पवार यांनी मात्र रोजच्या साध्या कपडय़ांमध्ये अर्थसंकल्प सादर केला. आतापर्यंतचे अर्थमंत्री भाषण करताना शेरोशायरी, काव्यपंक्ती सादर करून विरोधकांची वाहवा मिळवत असत. यशवंतराव मोहितेंनी सर्वप्रथम अर्थसंकल्प अशा हलक्या-फुलक्या रीतीने सादर केला होता. बॅ. शेषराव वानखेडे, मधुकरराव चौधरी, रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील, एकनाथ खडसे अगदी गेल्या वर्षी सुनील तटकरे यांनीही असेच हास्याचे कारंजे उडवले होते. इतकेच काय राजकारणात अगदी नवखे असणाऱ्या अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करताना ‘जनतेला काय हवे आहे, याची आम्हाला जाण आहे, महाराष्ट्राच्या विकासाचे आम्हाला भान आहे’ अशा काव्यपंक्ती सादर केल्या. अधूनमधून शेरोशायरीही त्यांनी म्हटली. पण विधानसभेत विरोधक स्वत:ची प्रतिष्ठा घालवून बसले...

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP